Tukaram Munde: एफडीएचा बॉलीवूड कलाकारांना दणका: ‘विमल इलायची’ जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस!
तुकाराम मुंढे १७ : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) बॉलीवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या तंबाखूजन्य उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात (Surrogate Advertising) केली जात असल्याचा गंभीर आरोप एफडीएने केला आहे. या नोटीसद्वारे तीनही कलाकारांना जाहिरातीतील त्यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले असून, तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री व प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई अधिक तीव्र केली आहे.तपासणीनंतर एफडीएने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी ही जाहिरात ‘विमल’ ब्रँडचा प्रसार करते, ज्याचे मुख्य उत्पादन ‘पान मसाला’ आहे.
महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायद्यानुसार ‘विमल पान मसाला’चे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. जाहिरातीचे सादरीकरण, संवाद आणि बाजारातील संदर्भ पाहता हा अप्रत्यक्ष प्रचार असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे सरोगेट जाहिरातींची तपासणी करण्याची एफडीएची ही पहिलीच वेळ असून, ब्रँड एन्डॉर्सर म्हणून सहभागी झालेल्या या तिन्ही अभिनेत्यांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.राज्यात २०१२ पासूनच तंबाखू आणि निकोटिनयुक्त उत्पादनांवर बंदी आहे.
याशिवाय, संघटित टोळ्यांमार्फत होणाऱ्या या अवैध व्यापारावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी एफडीए आणि पोलिस विभाग समन्वय साधत आहेत. ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ मधील कलम २४ आणि ५३ अन्वये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर निर्बंध आहेत. अशा फसव्या जाहिरातींच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो, त्यामुळे या अभिनेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे!
