Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!
कल्याण १४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना, त्यावर योग्य प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठा बांधून आधार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात प्लास्टरचे साहित्य संपले असल्याचे सांगून ते बाहेरून खरेदी करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने रुग्णाकडे ४०० रुपयांची मागणी केल्याचा आरोपही समोर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचून तीव्र संताप व्यक्त केला व प्रशासनाला जाब विचारला, ज्यामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळानंतर औषध विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयातील स्टोअरची पाहणी केली असता, फ्रॅक्चरच्या प्लास्टरसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरेसा साठा स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णालयाच्या साठा कक्षात साहित्य उपलब्ध असतानाही रुग्णाला ते बाहेरून आणण्यास का सांगण्यात आले, पायाला प्लास्टर करण्याऐवजी पुठ्ठ्याचा आधार का दिला गेला, आणि ४०० रुपयांची मागणी नेमकी कोणत्या कारणासाठी केली गेली, असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून रुग्णाला योग्य उपचार न देणाऱ्या व बाहेरून साहित्य आणण्यास सांगणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. साठा उपलब्ध असूनही रुग्णांना अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता केडीएमसी प्रशासन दोषींवर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे!
