Maharashtra Politics : राज्यात भाजपची ताकद वाढणार? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
मुंबई ०३ : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून भाजपने संघटन विस्तारासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी भाजपची वाट धरणार आहेत.वाशिम जिल्ह्यातील हा पक्षप्रवेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता हा प्रवेश सोहळा होणार आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती महादेव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सभापती विजय खानझोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन डोफेकर, विश्वास गोदमले, भागवत येवले, भारत व्यवहारे, एन. डी. राठोड तसेच मंगरुळपीर बाजार समितीचे माजी सभापती भास्कर शेगीकर यांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समितीचे माजी सभापती, सदस्य, सरपंच आणि १०० हून अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
कल्याण-डोंबिवलीतही राजकीय समीकरणे बदलली:-
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतही भाजप आणि शिंदे गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू झाली आहे.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्चित खडकूल यांनी शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत योग्य वेळी संधी आणि पद न मिळाल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे!
