Manoj jarange: परभणीत शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले: उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा रद्द करण्यासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा!
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचा आज दुसरा दिवस असताना, मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. खासदार बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर येणार आहेत.या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार बंडू जाधव यांना फोनवरून थेट इशारा दिला आहे.
“हा शेतकरी मेळावा आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा दौरा त्वरित रद्द करा, अन्यथा मी आंदोलनस्थळ सोडून मराठा बांधवांसह परभणीत दाखल होईन आणि पुढे जे काही नुकसान होईल, त्याचं खापर तुमच्यावरच फोडले जाईल,” असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले आहे.
तसेच जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले की, “संजय शिरसाट मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करत असताना त्यांच्या जीवावर उड्या मारण्यासाठी हा कार्यक्रम घेणार का?” सोबतच, “संजय शिरसाट यांनी रद्द केलेले प्रमाणपत्र द्या आणि मग एकनाथ शिंदेंना सांगा,” असेही त्यांनी जाधव यांना ठणकावले असून मेळावा रद्द न केल्यास गोंधळ अटळ असल्याचा इशारा दिला आहे.
या इशाऱ्यानंतर जरांगे यांनी कार्यकर्त्यांना वाहने तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या असून आंदोलनस्थळी ५० वाहनांचा ताफाही दाखल झाला आहे. त्यामुळे आता परभणीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या परिस्थितीत खासदार बंडू जाधव नेमका काय निर्णय घेतात आणि हा मेळावा पार पडणार की रद्द होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
