Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!
मनोज जरांगे पाटील २४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.सरकारचे एक विशेष शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. उद्योगमंत्री उदय सामंत सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचून थेट अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असून, दुपारी १ वाजताच्या सुमारास जरांगे पाटील यांच्याशी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करतील.
दुसरीकडे, जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाने मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी केली आहे. मागील आंदोलनादरम्यान पावसाने झालेला चिखल आणि जागेची कमतरता लक्षात घेऊन यंदा विशेष नियोजन केले जात आहे.अंतरवाली सराटीतही आंदोलनाची तयारी वेगाने सुरू आहे. गोदाकाठावरील १२३ गावांची बैठक घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
आंदोलकांसाठी अन्न, पाणी व वैद्यकीय सुविधांवर भर दिला जात असून, प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक आणि सकाळी-संध्याकाळी भाकरी पाठवण्याच्या सूचना जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!
