मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबईत पार पडलेल्या ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ नंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी या भावना व्यक्त केल्या.
त्या पुढे म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ हा केवळ एक जयघोष नसून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि अगणित स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाशी जोडलेली प्रेरणादायी भावना आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळेपणाने श्वास घेत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाला कोणीही विरोध करू नये, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
