Nepal floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता; 133 भारतीय नागरिकांचाही समावेश!
ताज्या बातम्या

Nepal floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता; 133 भारतीय नागरिकांचाही समावेश!

Aug 27, 2026

Nepal Tibet border flood: तिबेट सीमेजवळ नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात १६० जणांचा मृत्यू झाला असून ७५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. यामध्ये १३३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अनेक पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.पुराच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक शहरं आणि गावांमध्ये पाणी शिरलं. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल आणि दगडांचा मलबा साचला आहे. अनेक महत्त्वाचे पूल वाहून गेले असून किमान 12 जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झालंय. नेपाळ-चीन सीनावरील पूरग्रस्त भागांमध्ये लष्कर आणि सुरक्षा दनांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

भूकंपानंतर अवघ्या काही मिनिटांत पूर

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी तिबेट परिसरात भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांनी अचानक पूर आल्याची माहिती मिळाली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदी फुटली असावी आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली आल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र या पुरामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भोटे कोशी नदीची पाणीपातळी अचानक वाढली. त्यामुळे तिबेट सीमेजवळील रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यांना मोठा फटका बसला. राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करणं आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमावरील लेंडे नदीचं पाणी वाढलं. त्याचबरोबर डोंगरातील दगड-माती खाली घसरल्याने रसुवा जिल्ह्यातील सीमावर्ती तिमुरे शहरात भोटे कोशी नदीला अचानक मोठा पूर आला. पुढे हे पाणी त्रिशूली नदीत शिरलं.यानंतर पुराचा फटका नुवाकोट, चितवन, गोरखा, तनहू आणि नवलपरासी पूर्वसह अनेक जिल्ह्यांना बसला.काठमांडूपासून जवळपास 70 ते 200 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात या पुराचा परिणाम जाणवला.

157 जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

नेपाळ पोलिसांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारच्या माहितीनुसार सुमारे 500 जण अद्याप बेपत्ता आहेत. दुसरीकडे, चीनच्या सरकारी वृत्तवाहिनी CGTN ने दिलेल्या माहितीनुसार, सीमेच्या चिनी भागात तीन जणांचा मृत्यू झाला असून 265 जण बेपत्ता आहेत.पूरग्रस्त भागातून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये या आपत्तीची भीषणता स्पष्ट दिसतेय. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबत चिखल, मोठमोठे दगड आणि मलबा वाहून येताना दिसत आहे. पाण्याचा वेग वाढताच अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित जागेच्या दिशेने धावताना दिसले. एका व्हिडिओमध्ये चार मजली इमारत पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाात वाहून जाताना दिसते. रसुवा भागातील आणखी एका व्हिडिओमध्ये एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं दिसतं. तर एका ठिकाणी पाण्याच्या प्रचंड दबावामुळे ९ लांबलचक पूल अक्षरशः दोन भागांत तुटताना दिसतो.धाडिंगमधील एका व्हिडिओमध्ये पुराचं पाणी पुलाला धडकत असून काही वेळातच तो पूल पाण्याबरोबर वाहून जाताना दिसतो. आणखी एका व्हिडिओमध्ये चिखलमिश्रित पाण्याचा जोर इतका मोठा होता की अवघ्या 30 सेकंदांत एक पूल पूर्णपणे पाण्याखाली जाऊन वाहून गेला.

सुमारे 100 जणांची सुटका

पूरग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या सुमारे 100 जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 30 जणांवर काठमांडूमधील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर बचाव आणि मदतकार्याला वेग देण्यासाठी नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांचे जवान पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले.

133 भारतीय आणि 37 NRI बेपत्ता

नेपाळ सरकारच्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या सुमारे 500 जणांमध्ये किमान 133 भारतीय नागरिक आणि 37 अनिवासी भारतीय म्हणजेच NRI आहेत. यातील किमान 50 भारतीय कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते.ईशा फाउंडेशननेही त्यांचे 77 सदस्य बेपत्ता असल्याची माहिती दिलीये. हे सर्वजण एका इमिग्रेशन सेंटरमध्ये उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सद्गुरू यांनी सांगितलं की, त्या केंद्रात असलेल्या लोकांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, संस्थेचे 495 सदस्य सुरक्षितपणे परतल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर नेपाळ सरकारने इमिग्रेशन सेंटरमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली.तमिळनाडूतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेले 37 पर्यटक तंजावूरचे रहिवासी आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळसह इतर काही भारतीय राज्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये आपल्या राज्यातील लोक असण्याची शक्यता या राज्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय आणि NRI नागरिकांव्यतिरिक्त अमेरिकसह मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स अशा दोन डझनहून अधिक देशांतील नागरिकही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

भारताकडून मदतीचा हात

नेपाळमधील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने मदतीचा हात पुढे केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या कठीण परिस्थितीत नेपाळला आवश्यक ती सर्व मानवी मदत देण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये NDRF अलर्टवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेपाळमधील पुराच्या परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त केलं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं, त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केलीये. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळसोबत ठामपणे असल्याचं शाह यांनी सांगितलं!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *