Tukaram Mundhe: अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीनंतर एफडीए ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा राज्यभर तपासणीचा बडगा!
अन्न सुरक्षा ताज्या बातम्या

Tukaram Mundhe: अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीनंतर एफडीए ॲक्शन मोडमध्ये; तुकाराम मुंढेंचा राज्यभर तपासणीचा बडगा!

Aug 27, 2026

अंगणवाड्यांमधील निकृष्ट पोषण आहाराच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अन्न व स्वच्छतेची तपासणी होणार आहे.अंगणवाड्यांमध्ये मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आता तुकाराम मुंढे सज्ज झाले आहेत. एफडीएच्या रडारवर आता अंगणवाड्या आहेत, तर गणेशोत्सवातल्या महाप्रसादावरही एफडीएची नजर आहे. निकृष्ट पोषण आहारावर एका अंगणवाडी सेविकेने सवाल उपस्थित केल्यानंतर आता अंगणवाड्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आल्या आहेत. एफडीएने अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराकडे आणि तिथल्या स्वच्छतेकडे आपले लक्ष वळवले आहे.

निकृष्ट दर्जाचे जेवण, भुंगे लागलेली कडधान्ये, खिचडीत आळ्या आढळणे आणि अन्नातील प्रचंड अस्वच्छता यांसारख्या गंभीर तक्रारींची दखल घेत एफडीएने राज्यभर मोठ्या मोहिमेचा इशारा दिला आहे. एफडीए आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबवणार आहे, जेणेकरून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा कुठलाच प्रकार घडणार नाही.तर दुसरीकडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या आयोजनावरही एफडीएची नजर राहणार आहे.

यापुढे एफडीएच्या परवानगीशिवाय महाप्रसाद आयोजित करणे मंडळांना महाग पडू शकते.मुळात महाप्रसादामुळे किंवा सामूहिक अन्नदानावेळी अन्नातून विषबाधेसारख्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी स्वच्छतेचा निकष पाळला जावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र यामुळे नियम मोडून अन्नवाटप करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.असे असले तरी आता तुकाराम मुंढेंच्या मोहिमेमुळे मुलांना कागदावरचा नव्हे तर प्रत्यक्षात पौष्टिक आहार मिळण्याची आशा बाळगायला हरकत नाही!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *