Pune: पुण्यात १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू; सोशल मीडिया रील्स अन् जमावावर कडक बंधने!
पुणे १८ : पुणे शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ दिवसांसाठी जमावबंदीचे कडक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश १८ ऑगस्टच्या मध्यरात्री १:०० वाजेपासून ते ३१ ऑगस्टच्या रात्री १२:०० वाजेपर्यंत अंमलात राहतील. आगामी ईद-ए-मिलाद, नारळी पूर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी, तसेच आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि अतिक्रमण हटाव कारवायांमुळे कोणतीही अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(२)(३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.या जमावबंदीच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, विनापरवानगी मिरवणूक काढणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
त्याशिवाय शस्त्रे, लाठ्या, तलवारी, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगड किंवा फेकावयाची हत्यारे जमा करणे, कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिमांचे वा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन व दहन करणे यावर बंदी असेल. जातीय सलोखा बिघडवणारी भाषणे देणे, अवाच्य घोषणाबाजी करणे आणि वादग्रस्त फलक वा चित्रे प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेषतः गुन्हेगारांचे व्हिडिओ अथवा रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणे, दहशत पसरवणे किंवा धमक्या देणे यांसारख्या कृत्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.या नियमांमधून शासकीय सेवेतील व्यक्ती आणि ३.५ फुटांपर्यंतची काठी बाळगणारे खाजगी सुरक्षा रक्षक यांना वगळण्यात आले आहे.
मात्र, सामान्य नागरिकांनी या आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार कडक कायदेशीर कारवाई, दंड किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याच कालावधीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या विद्यार्थ्यांसोबतच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले असल्याने या कार्यक्रमाला पोलीस परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
