Railway accident: नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: रेल्वे अपघातात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी मिळणार ८ लाखांची भरपाई!
ताज्या बातम्या वाहतूक

Railway accident: नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: रेल्वे अपघातात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी मिळणार ८ लाखांची भरपाई!

Aug 21, 2026

मुंबई २१ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातातील भरपाईबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. रेल्वे पकडताना किंवा चढताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता या कारणावरून रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.ही घटना १४ मे २०२३ रोजी मूर्तीजापूर रेल्वे स्थानकावर घडली होती. यवतमाळ जिल्ह्यातील अंकुश अशोक निमकर हे तरुण रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा तोल गेला आणि ते चाकाखाली आले, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या आईने भरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता; मात्र, अपघाताचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे कारण देत रेल्वेने हा दावा फेटाळून लावला होता.

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने रेल्वे प्रशासनाचा तो दावा मोडून काढला. प्रत्येक अपघाताच्या वेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध असेलच असे नाही, त्यामुळे उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे गरजेचे असते, असे मत न्यायालयाने नोंदवले. रेल्वेत चढताना तोल जाऊन पडणे ही ‘अनपेक्षित रेल्वे घटना’ मानली पाहिजे आणि केवळ साक्षीदार नाही म्हणून मृत कुटुंबियाला भरपाईपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे, असे सांगत न्यायालयाने स्पष्ट केले.

या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयांचा आधार घेत रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा निर्णय बाजूला सारला. नागपूर खंडपीठाने मृत अंकुश निमकर यांच्या आईच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना ८ लाख रुपयांची भरपाई ३ महिन्यांच्या आत देण्याचे स्पष्ट आदेश रेल्वे प्रशासनाला दिले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *