Thane: ठाणे जिल्ह्यात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांचा उत्साह; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल आणि पर्यायी मार्ग जाहीर!
ठाणे २६ : मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी २६ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांदरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन राखण्यासाठी भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बुधवारी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.अंबाडी नाका व पारोळ फाटा येथून वाड्याकडून भिवंडीकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने राष्ट्रीय महामार्ग ८ किंवा जलवाहिनी मार्गाने वळवण्यात आली आहेत.
तसेच नदीनाका मार्गे शहरात येणाऱ्या वाहनांना पारोळ फाट्यावर बंदी असून, हलकी वाहने खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड मार्गे जातील. चाविंद्रा व जांबोळी नाका भागातील वडपे तपासणी नाक्याकडून शहरात येणाऱ्या वाहनांना जांबोळी व चाविंद्रा नाका येथे बंदी असेल. बस प्रवाशांना चाविंद्रा नाक्यावर उतरवले जाईल आणि इतर वाहने धामणकरनाका जलवाहिनी मार्गे पुढे जातील.आग्रा रोडमार्गे ठाणे-कल्याणकडून जुना आग्रा रोड मार्गे जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पंपापुढे बंदी असून, ही वाहने नागाव मार्गे धावतील. रांजनोली नाका चौकातून भिवंडीत येणाऱ्या एसटी, केडीएमटी, रिक्षा व जड वाहनांना बंदी असेल.
ही वाहने मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका, अंजुरफाटा अथवा वसई रोड मार्गे जातील.कल्याण व विठ्ठलवाडी विभागातही मार्गात बदल करण्यात आले आहेत. कल्याण येथील पत्रीपूल, एपीएमसी मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पत्रीपूल येथून डावे वळण घेऊन गोविंदवाडी बायपास मार्गे पुढे रवाना होतील. विठ्ठलवाडीतील नेहरू नगर, उल्हासनगर जुने बस स्टॉप, हिललाईन पोलीस ठाणे, नेताजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कॅम्प रोड ते कैलास कॉलनी या मिरवणूक मार्गावर मिरवणूक पुढे जाईपर्यंत ‘नो पार्किंग’ लागू राहील. वाहनांना मुख्य रस्ता सोडून पर्यायी रस्त्यांवर पार्किंगची मुभा असेल.
मुंब्रा व राबोडी विभागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मुंब्रा येथील रेतीबंदर मार्गे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना, तसेच खाजगी व सरकारी बसेसना रेतीबंदर आणि ‘वाय’ जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने रेतीबंदर मुंब्रा बायपास मार्गाने पुढे जातील किंवा प्रवाशांना रेतीबंदर येथेच उतरवून परतावे लागेल. तसेच राबोडीतील के. व्हिला नाका मार्गे आकाशगंगा व राबोडीकडे जाणाऱ्या वाहनांना के. व्हिला येथे बंदी असेल. ही वाहने माँ मीनाताई ठाकरे चौक रोडने जुन्या राबोडी पोलीस ठाण्यामार्गे इच्छित स्थळी जातील!
