Thane: ठाण्यातील राम मारुती रोडवर ‘एफडीए’ची धाड; बंदी असलेला पान मसाला अन् तंबाखू जप्त, नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल!
ठाणे २६ : ठाण्यातील नौपाडा येथील राम मारुती रोड या अत्यंत गजबजलेल्या आणि ‘जुने ठाणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने एका पान टपरीवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. हजारो ठाणेकर खरेदी तसेच फेरफटक्यासाठी या भागात येत असतात; मात्र याच ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याचे एफडीएच्या कारवाईतून समोर आले आहे.ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ‘विना’ नावाच्या पान टपरीवर बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखू साठवून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने टपरीची पाहणी केली.या कारवाईदरम्यान पान टपरी चालक अजय पटेल (वय २०) याच्याकडून १३ हजार १०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला, जो अधिकाऱ्यांनी जप्त केला. संशयित आरोपी अजय पटेल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बाबूरे येथील रहिवासी असून, सध्या तो कल्याण मधील पूर्णिमा टॉकीज परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(१), २६(२)(४), २७(३)(ड), ३०(२)(अ), ५९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे!
