Thane: दि. २४ ऑगस्ट, २०२६ ठाण्यात रंगणार मंगळागौर २०२६ स्पर्धा… २९ ऑगस्ट रोजी  “मैत्री”  संकल्पनेवर साकारणार मंगळागौर…”विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व परिषा प्रताप सरनाईक यांचा अभिनव मंगळागौर उपक्रम!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: दि. २४ ऑगस्ट, २०२६ ठाण्यात रंगणार मंगळागौर २०२६ स्पर्धा… २९ ऑगस्ट रोजी “मैत्री” संकल्पनेवर साकारणार मंगळागौर…”विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व परिषा प्रताप सरनाईक यांचा अभिनव मंगळागौर उपक्रम!

Aug 24, 2026

ठाणे /विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि सौ. परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्ताने ठाण्यासह ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, आयलीफ रिट्झ बँक्वेट हॉल, आर मॉल, ३ रा मजला, घोडबंदर रोड, ठाणे येथे हा पारंपरिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडणार आहे.विहंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नेहमीच कॅन्सर जनजागृती उपक्रम राबविले जातात, त्यापैकी एक उपक्रम म्हणजे “मंगळागौर”. दरवर्षी नव्या आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित मंगळागौर सादरीकरण पाहायला मिळते.

मागील वर्षी “ऐतिहासिक रणरागिणींचा सन्मान” ही संकल्पना होती. यंदा “मैत्री” ही संकल्पना घेऊन विविध महिला संघ आपले सादरीकरण करणार आहेत. मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, पारंपारिक खेळ तर जपले जातात त्याचबरोबर महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सर संदर्भात देखील जनजागृती केली जाते. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय, प्रार्थनास्थळे यांच्या आजूबाजूला पानटपऱ्या, हातगाड्या मधून पान-गुटखा, ड्रग्स, चायनीस पदार्थ विकले जात असून त्यातून नवीन पिढी आहारी जाऊन त्याच्या आरोग्याला घातक ठरत आहे. आपण आपल्या मुलांना कोणत्या गोष्टींचे ज्ञान दिले पाहिजे व कोणत्या गोष्टीपासून दूर ठेवावे याबाबत पालकांनी व समाजाने जागृत असले पाहिजे यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने मंगळागौर हे एक उत्तम माध्यम आहे असे नगरसेविका सौ. परिषा प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्थानिक महिला ह्या काही उच्चभ्रू समाजात राहतात, काही चाळीमध्ये राहतात, काही आदीवासी महिला आहेत, काही घरकाम करणाऱ्या आहेत तर काही महिला उच्च शिक्षित असून एकत्र स्पर्धेत भाग घेतात ही एक कौतुकाची गोष्ट आहे. हे सादरीकरणं पारंपरिक पद्धतीने किंवा आधुनिक (Fusion) शैलीने सादर होणार आहे. ही मंगळागौर स्पर्धा सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरणार आहे. त्याप्रमाणे पारंपारिक व आधुनिक (फ्युजन) कॅटेगिरीला प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रथम पारितोषिक रु. २१,०००/-, द्वितीय पारितोषिक रु. १५,०००/-, तृतीय पारितोषिक रु. १०,०००/- तसेच सर्व ग्रुपमधून ज्या ग्रुपने वेगळे सादरीकरण केले असेल त्या ग्रुपला “सुपरस्टार-२०२६” म्हणून जम्बो बक्षिस म्हणून रु. २५,०००/- चे पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान स्पर्धक महिलांसोबत उपस्थित प्रेक्षकांसाठीही विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे सहभागींच्या आनंदात भर पडेल. ठाणे व परिसरातील प्रेक्षकांनी उपस्थित राहून महाराष्ट्रातील या अनोख्या परंपरेचा हा उत्सव अनुभवावा, असे आवाहन विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा, नगरसेविका सौ. परिषा प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *