Thane: घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीनंतर अपघातांची मालिका!
ठाणे ताज्या बातम्या वाहतूक

Thane: घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीनंतर अपघातांची मालिका!

Aug 19, 2026

ठाणे १९ : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीसाठी चर्चेत असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या दीड महिन्यांपासून अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका सुरू आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यातून होणारी संभाव्य जीवितहानी यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी घोडबंदर परिसरात अवजड वाहन उलटून ते रिक्षावर पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा ट्रेलरखाली चेंगरुन मृत्यू झाला होता. या घटनानंतर घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ठाणे शहराच्या पश्चिम भागासह घोडबंदर मार्गालगतच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे.

या भागात टोलेजंग इमारती, गृहसंकुले आणि व्यावसायिक आस्थापना वाढत असताना त्या तुलनेत रस्त्याची क्षमता मात्र अपुरी पडत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होते. घोडबंदर मार्ग हा ठाणे शहराला मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावर सध्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

मेट्रो मार्गिका आणि स्थानकांच्या उभारणीबरोबरच सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्यामध्ये समावेशीकरण, विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे आणि वाहतूक व्यवस्थेतील बदल यामुळे उपलब्ध रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी होत आहे. परिणामी वाहनांना अरुंद रस्त्यातून मार्गक्रम करावे लागते. घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची समस्ये प्रमाणे अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. घोडबंदर येथील कापूरबावडी ते कासारवडवली या पाच ते सहा किमी अंतरावर वेगवेगळ्या कारणांमुळे अवजड वाहने उलटणे, अन्य वाहनांना धडकणे किंवा नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जाणे अशा घटना घडत आहेत.

अवजड वाहन उलटल्यास त्याखाली लहान वाहने किंवा रिक्षा सापडण्याची शक्यता असल्याने अशा अपघातांमध्ये जीवितहानीचे प्रमाण अधिक असू शकते. काही दिवसांपूर्वी घोडबंदर परिसरात अवजड वाहन उलटून रिक्षावर पडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेने घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. कोंडीमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना आता अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आणखी एका धोक्याला सामोरे जावे लागत आहे.

चौकट अपघातांचा घटनाक्रम
– १८ ऑगस्टला पहाटे ४ वाजता दिल्ली येथून न्हावाशेवा येथे वाहतूक करणारा ट्रक घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी भागातून वाहतूक करत होता. वाहनामध्ये १० टन वजनाचे लाकडी साहित्य होते. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. अपघातग्रस्त वाहन रस्त्यामधून बाजूला करण्यास सुमारे चार तासांचा कालावधी लागला. – २९ जुलैला सकाळी ७.१५ वाजता कापूरबावडी पेट्रोल पंप परिसरात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकला. हे वाहन राजस्थानहून घोडबंदर मार्गे महाड येथे वाहतूक करत होते.

– २६ जुलैला सकाळी ६ वाजता घोडबंदर येथून चितळसर मानपाडा भागात कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटनेर १० फूट खोल खड्ड्यात उलटला. कंटेनर न्हावाशेवा येथून गुजरातच्या दिशेने वाहतूक करत होता. त्यामध्ये २५ टन वजनाचे भंगार साहित्य होते. – २३ जुलैला सकाळी एक कंटेनर पातलीपाडा उड्डाणपूलाच्या दुभाजकाला आदळला. हा कंटेनर रस्त्याच्या बाजूला काढला जात असताना तो उलटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

– ८ जुलैला दुपारी १ वाजताच्या सुमारास कासारवडवली भागात क्रेनचा मागील भाग रिक्षावर उलटला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा पूर्णत: चुराडा झाला होता. – ३ जुलैला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कासारवडवली भागात पुण्याहून डहाणूच्या दिशेने निघालेला ट्रक कासारडवली उड्डाणपूलाच्या दुभाजकाला धडकल्याने ट्रक उड्डाणपूलाखालील मार्गावर लोंबकळत होता. या ट्रकमध्ये १२ टन वजनाचे गूळ होते.

जड-अवजड वाहन आमच्या वाहनाच्या बाजूने जात असल्यास भिती निर्माण होते. अनेकदा ही वाहने झुकलेली किंवा धोकादायकरित्या सामान वाहून नेत असतात. त्यामुळे प्रशासनाने या वाहतुकीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *