Thane: ठामपाची नियमावली येणार…भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार..आमदार संजय केळकर यांचा पुढाकार!
ठाणे २४: ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीच्या घटना घडत आहेत. श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आदर्श नियमावली तयार करणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची चिन्हे आहेत.खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित १२३व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विविध गृहासंकुलातील प्रतिनिधींनी सुमारे एक हजारहून अधिक सह्यांचे निवेदन आमदार संजय केळकर यांना देण्यात आले.
या निवेदनानुसार भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, हल्ले तसेच श्वानप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात होणारे वाद यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर आणि गृहसंकुलात कुठेही अन्नपदार्थ टाकत असल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.याबाबत श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची आठवण करून दिली. संबंधित अधिकारी याबाबत आदर्श नियमावली तयार करणार असून येत्या शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात नियमावली सादर होऊन उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे.याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी एकमेव जागेचा मुद्दा सोडला तर महापालिकेने अद्याप कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.
त्यामुळे एसओपी लागू होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात शहरातील राजविलास सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. या सोसायटीला मागील सहा महिने पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. श्री. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून जलवाहिनीची दुरुस्ती आणि अन्य उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तत्काळ सोसायटीची पाहणी केली.डोंबिवलीत ऐश्वर्या सिंडिकेट या फायनान्स कंपनीने सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरीकांची कोट्यवधींची फसवणूक केली असून सुमारे १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारदार गुंतवणूकदारांच्या निवेदनांनातर श्री. केळकर यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली.
केवळ संचालकांना अटक करून समस्या सुटणार नसून मालमत्ता ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्य प्रक्रियेला देखील वेग देणे गरजेचे असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. या प्रकरणी दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिव्यातील निवासी गृहसंकुलात बेकायदेशीरपणे वाईन शॉप सुरू असून रात्री एक वाजेपर्यंत दुकान सुरू राहत असल्याने रहिवाशांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याची तक्रारही या कार्यक्रमात दाखल झाली. श्री. केळकर यांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांशी चर्चा केली. त्यानुसार संबंधित दुकान चालकाला नोटीस बजावून ५०हजारांचा दंड ठोठावण्याचे मान्य केले. पुन्हा नियमभंग केल्यास परवाना रद्द करण्यात येईल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याचे श्री.केळकर म्हणाले.
वाघबीळ आणि कावेसरमध्ये दोन विकासकांनी करारनामे करून जागा ताब्यात घेतल्या, परंतु रहिवाशांना घरेच दिली नसल्याची तक्रार कार्यक्रमात प्राप्त झाली. श्री. केळकर यांनी दोन्ही विकासकांशी संपर्क साधला. त्यानुसार एका विकासकाने घरे देण्याबाबत रहिवाशांना लेखी लिहून देण्याचे मान्य केले तर अन्य विकासक पुढील कार्यक्रमात उपस्थित राहून बैठकीत निर्णय घेणार आहेत.कार्यक्रमास नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, सुनेश जोशी, सुरेश कांबळे, दया यादव, राजेश गाडे, माधुरी मेटांगे, रक्षा यादव आदी उपस्थित होते!
