Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!
ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या दहीहंडी उत्सवात प्रो गोविंदाचा थरार देखील ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. त्यामुळे साई जलाराम प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या दहीहंडी उत्सवाकडे गोविंदा पथकांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून बाळकुम परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तब्बल २१ लाख रुपयांच्या बक्षिसांमुळे विविध गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या दहीहंडी उत्सवाला राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह सिनेकलाकारही उत्सवाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक तथा नगरसेवक संजय भोईर यांनी दिली. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला यंदा मोठी रंगत येणार आहे.
विशेष आकर्षण म्हणजे यंदा ‘प्रो गोविंदा’ या मानाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनाही या उत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये आपल्या कौशल्याची आणि साहसी खेळाची झलक दाखविणाऱ्या या पथकांच्या सहभागामुळे बाळकुमच्या दहीहंडीमध्येही प्रो गोविंदाचा थरांचा थरार पाहायला मिळणार आहे. या पथकांच्या उपस्थितीमुळे उत्सवाचे आकर्षण आणखी वाढणार असल्याचे आयोजक विकेश भोईर यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गोविंदा पथकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तसेच सहभागी गोविंदा पथकांचा विमाही काढण्यात आला आहे. त्यामुळे उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नगरसेवक संजय भोईर यांनी स्पष्ट केले. या उत्सवात १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे. तर ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ५ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळणार आहे.
८ थर लावणाऱ्यांना २५ हजार,७ थर लावणाऱ्यांना १० हजार,महिला गोविंदा पथकाला २५ हजार आणि बाळकूमची मनाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला ३० हजार रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.दहीहंडी हा केवळ थर रचण्याचा उत्सव नसून परंपरा, एकजूट, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा म्हणून साजरा केला जातो. २६ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदा २१ लाखांच्या बक्षिसांची घोषणा, बाळकुमची मानाची हंडी आणि प्रो गोविंदा पथकांचा सहभाग यामुळे साई जलाराम प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव ठाण्यातील प्रमुख आकर्षणच केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे!
