Thane :  गडकरी रंगायतनमध्ये ‘राष्ट्रजागृती  आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म’ या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाने राष्ट्र, इतिहास आणि सनातन संस्कृतीच्या जतनाचा संदेश!
ठाणे ताज्या बातम्या

Thane : गडकरी रंगायतनमध्ये ‘राष्ट्रजागृती आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म’ या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाने राष्ट्र, इतिहास आणि सनातन संस्कृतीच्या जतनाचा संदेश!

Aug 19, 2026

ठाणे १९ – आशीर्वाद फाउंडेशन, ठाणे यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रजागृती : आव्हाने, समाधान आणि सनातन धर्म’ या विशेष व्याख्यानाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुप्रसिद्ध राष्ट्रचिंतक श्री. पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानासाठी गडकरी रंगायतन पूर्णपणे भरले होते.कार्यक्रमाला ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, पितांबरी समूहाचे एमडी रवींद्र प्रभुदेसाई, ठाणे जनता बँकेचे चेअरमन शरदजी गांगल, SMC Infrastructure चे अमेय सुहास मेहता, ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, तसेच नगरसेवक संजय वाघुले, प्रतिभा मढवी आणि मृणाल पेणसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, उदय निरगुडकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, संदीप लेले, रवींद्र प्रभुदेसाई, शरद गांगल, पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ आणि आशीर्वाद फाउंडेशनच्या संस्थापिका अश्विनी पटवर्धन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी आशीर्वाद फाउंडेशनच्या संस्थापिका अश्विनी पटवर्धन यांनी प्रास्ताविकातून संस्थेची भूमिका स्पष्ट केली. सनातन परंपरेतील ज्ञान आणि आजच्या पिढीतील प्रश्न यांच्यात संवादाचा दुवा निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरुण पिढीवर टीका करण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे आणि आपल्या परंपरेतील विचार आजच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“टीका करणे सोपे आहे; योगदान देणे कठीण आहे,” या भूमिकेतून आशीर्वाद फाउंडेशनच्या माध्यमातून योग, कला, विद्यार्थ्यांशी संवाद, दिव्यांग मुलांसाठी उपक्रम तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत भारतीय संस्कृती, मूल्ये आणि जीवनदृष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.*इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रजागृतीवर पुष्पेंद्रजींचा भर*आपल्या दीर्घ व्याख्यानात श्री. पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांनी समाजात अभ्यास, सत्य आणि जिद्दीने योग्य विचार पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला. समाजासाठी योग्य कार्य करण्याचा संकल्प आणि सत्याच्या आधारावर विचार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

सनातन धर्मातील अनेक परंपरा आणि संकल्पनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज त्यांनी मांडली. सूर्यपूजा, पंचतंत्र आणि निसर्गाशी संबंधित भारतीय परंपरांमागील विचार व वैज्ञानिक आधार यांचा संदर्भ देत सनातन धर्माच्या शाश्वततेवर त्यांनी भाष्य केले.इतिहास विसरल्यास समाज कमजोर होतो, असे सांगत इतिहासाचे जतन आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि तिच्या परंपरेचे संरक्षण करण्याची गरज यावरही त्यांनी भर दिला.भारताचा इतिहास, स्वातंत्र्य, संविधान आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास योग्य संदर्भ आणि तथ्यांच्या आधारे समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

योग्य इतिहासाची जाणीव आणि समज नसल्यास सुदृढ राष्ट्रनिर्मितीचा प्रवास अपूर्ण राहू शकतो, असे त्यांनी नमूद केले.राजकारण, धर्म आणि समाज या तिन्ही क्षेत्रांमध्ये जागरूक नागरिकत्वाची आवश्यकता असल्याचे सांगत समाजाने आपल्या इतिहासाशी, संस्कारांशी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहण्याचे आवाहन त्यांनी केले.धर्माचा अर्थ केवळ धार्मिक आचार-विचार नसून कर्तव्य आणि जीवनाला दिशा देणारी मूल्यव्यवस्था या व्यापक अर्थाने समजून घेण्याची गरज त्यांनी मांडली. राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्यातील संबंध स्पष्ट करताना संस्कार, परंपरा आणि सांस्कृतिक स्मृती यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.ऐतिहासिक स्मारके, प्रतीके आणि ऐतिहासिक तथ्यांचे जतन करून पुढील पिढीला त्याबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजातील गैरसमज दूर करून सत्य, तथ्य, इतिहास आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे योग्य दिशा स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.व्याख्यानाच्या समारोपात समाजाने आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि संस्कारांचा अभिमान बाळगून जागरूकतेच्या दिशेने सकारात्मक पावले उचलावीत, असा संदेश त्यांनी दिला. *कर्णबधिर मुलांच्या कलेचा मान्यवरांकडून गौरव*कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणून कर्णबधिर मुलांनी साकारलेल्या चित्रांच्या सुंदर फ्रेम्स मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आल्या. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागाला सन्मान देण्याचा प्रयत्न करण्यात आला.गडकरी रंगायतनमध्ये उपस्थित नागरिकांनी संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्र, भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरेविषयी चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी आशीर्वाद फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.आशीर्वाद फाउंडेशनच्या संस्थापिका अश्विनी पटवर्धन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, नागरिक, कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतकांचे आभार मानले. भारतीय परंपरेतील ज्ञान, मूल्ये आणि जीवनदृष्टी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचे असे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *