Thane : ठाणे रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरी; तरुणी अटकेत!
ठाणे ताज्या बातम्या

Thane : ठाणे रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरी; तरुणी अटकेत!

Aug 19, 2026

ठाणे १९ : ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला ठाणे रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तिच्याकडून चोरीच्या सोनसाखळीसह तब्बल २ लाख ३२ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.डोंबिवलीतील पलावा परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिला १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून अंबरनाथ धीम्या लोकलच्या महिला डब्यात चढत होत्या.

याचवेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या प्रियांका विशाल अहिरे (२१) हिने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली.ही घटना फलाटावर साध्या वेशात बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पाठलाग करून प्रियांका अहिरे हिला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान तिच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किमतीची १०.८६ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ आढळली. तसेच फिर्यादी महिलेच्या तक्रारीतील ७७ हजार रुपये किमतीची ५.३८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी देखील पोलिसांनी जप्त केली.

या कारवाईत एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रियांका अहिरे हिला अटक करण्यात आली आहे.दरम्यान, आरोपी तरुणीने यापूर्वीही अशाच प्रकारे अन्य प्रवाशांचे दागिने चोरले आहेत का, याचा तपास ठाणे रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई महिला पोलीस हवालदार अवंतिका सुर्वे आणि गीता राऊळ यांनी केली!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *