Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!

Aug 29, 2026

ठाणे दि. 28 :स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महिला नेत्या मीनाताई कांबळी, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.

धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आज माझ्या लाडक्या बहिणींनी अखंडपणे जोपासली असल्याचे सांगितले.स्वर्गीय गुरुवर्य दिघे साहेबांच्या काळापासून या ठिकाणी महिला, भगिनी आणि नागरिक आपल्या समस्या घेऊन तसेच सण-उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र येत असत. यंदाही रक्षाबंधन सोहळ्याचे स्वरूप अतिशय भव्य होते. संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या टोकापासून ते कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, आणि उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून लाखो महिला ठाण्यात दाखल झाल्या होत्या.आपल्या भावाला राखी बांधताना महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधानाचे भाव दिसत होते, ते वर्णन करण्यापलीकडचे असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला सुरुवात केली होती.

या योजनेद्वारे राज्यातील हजारो-लाखो महिलांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य जमा करण्यात करण्यात आले. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या हक्काचे पैसे स्वतःच्या सहीने बँकेतून काढण्याचा पूर्ण अधिकार मिळाला. यासोबतच मुलींना उच्चशिक्षण मोफत देण्याचा निर्णय,एसटी प्रवासात ५०% सवलत,लेक लाडकी लखपती योजना, वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. लाडक्या बहिणींच्या पाठींब्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे एवढे मोठे यश महायुतीला मिळाले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या उपकारांतून आम्ही कधीही उतराई होऊ शकत नाही,” असे शिंदे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेची टीम नेपाळमध्ये दाखल

नेपाळमध्ये आलेल्या भीषण आपत्तीनंतर शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल आणि शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन टीम नेपाळमध्ये दाखल झाली असून मदतकार्याला सुरुवात केली आहे. याबाबत आपण स्वतः ही स्थानिक प्रशासन, खासदार आणि नेपाळच्या गृहमंत्र्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला असून नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेना युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *