Thane: थरांची उंची वाढणार, जल्लोषाचा आवाज घुमणार…टेंभीनाक्याची मानाची हंडी पुन्हा एकदा ठाण्याच्या उत्सवाला नवी उंची देणार ;मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक…महिला गोविंदांसाठीही विशेष बक्षीस!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: थरांची उंची वाढणार, जल्लोषाचा आवाज घुमणार…टेंभीनाक्याची मानाची हंडी पुन्हा एकदा ठाण्याच्या उत्सवाला नवी उंची देणार ;मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक…महिला गोविंदांसाठीही विशेष बक्षीस!

Sep 1, 2026

ठाणे – ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, भगव्या रंगाने सजलेला परिसर आणि मानवी मनोऱ्यांच्या थराराने पुन्हा एकदा टेंभीनाका दुमदुमणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात जपली जाणार असून, शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी टेंभीनाक्यावर थरांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दहीहंडी उत्सवात ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या मानाच्या हंडीसाठी दोन्ही शहरांतील पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी मुंबईतील दहीहंडीचा जल्लोष ठाण्यात आणत टेंभीनाक्यावरील उत्सवाला वेगळी ओळख मिळवून दिली. दिघेसाहेबांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा पुढे नेत टेंभीनाक्याच्या हंडीला ठाण्याची ‘मानाची हंडी’ म्हणून नवी ओळख मिळवून दिली. बक्षीस जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात देण्याची परंपराही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरली आहे.

थरांनुसारही बक्षिसांची बरसात…

यंदाच्या उत्सवात महिला गोविंदा पथकांसाठी 1 लाख रुपयांचे विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सात थर रचणाऱ्या पथकासाठी 10 हजार, सहा थरांसाठी 7 हजार, पाच थरांसाठी 5 हजार, तर चार थरांसाठी 4 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी त्यामागे साहस, कौशल्य आणि सांघिक ताकदीचे मोठे आव्हान असते. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. हंडी फोडताना सुरक्षेसाठी रॅपलिंगमध्ये वापरले जाणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

कलाकारांची मांदियाळी अन् संगीताचा जल्लोष….

दहीहंडी पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी यंदा मनोरंजनाचीही मोठी मेजवानी असणार आहे. नामवंत गायक, चित्रपटसृष्टीतील कलाकार, मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार, लावणीचा ठेका, जल्लोषमय गाणी, दमदार साउंड आणि नेत्रदीपक रोषणाई यामुळे टेंभीनाका परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. गोविंदांच्या थरांसोबतच संगीत, नृत्य आणि मनोरंजनाचे थरही या सोहळ्याला रंगत आणणार आहेत.

दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा प्रमुख), टेंभीनाका मित्रमंडळाचे नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *