पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ; नवे दर लागू!
केंद्र सरकारने इंधन निर्यातीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’ (Windfall Tax ) मध्ये मोठी वाढ केली आहे. सरकारने जाहीर केलेले हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स प्रति लिटर २.५ रुपयांवरून वाढवून ३.५ रुपये करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरील टॅक्समध्येही मोठी वाढ करण्यात आली असून तो प्रति लिटर १५.५ रुपयांवरून थेट २४ रुपये करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारे सततचे बदल, तेल कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा आणि जागतिक बाजारपेठेतील सद्यस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. नियम आणि धोरणानुसार, प्रत्येक २ आठवड्यांनंतर केंद्र सरकारकडून पेट्रोलियम उत्पादनावरील विंडफॉल टॅक्सचा आढावा घेतला जातो. या आढाव्यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रिफायनिंग कंपन्या आणि तेल उत्पादकांना नेहमीपेक्षा जास्त नफा झाल्यास, सरकार त्या अतिरिक्त उत्पन्नाचा काही भाग कर म्हणून वसूल करते; यालाच विंडफॉल टॅक्स म्हटले जाते.
तज्ज्ञांच्या मते, टॅक्समधील या वाढीमुळे निर्यात करणाऱ्या तेल कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम होणार आहे. मात्र, देशांतर्गत बाजारातील सामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर याचा कोणताही थेट परिणाम होणार नाही. भारतातील इंधनाचे दर हे इतर अनेक घटकांवर अवलंबून असल्याने स्थानिक पातळीवर दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि सरकारच्या पुढील आढाव्यावर बाजारपेठेचे लक्ष असेल!
