महापालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियंमाचे मंडळांनी पालन करुन सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा- महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे २१ : सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी ठाणे महापालिका, पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व दहीहंडी व सार्वजिनिक गणेशमंडळाने करावे असे आवाहन करत असतानाच गणेशात्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डयांची दुरूस्ती करावी, विसर्जन घाटांवर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या.
महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, जितेंद्र निकम, प्रदुषण नियंत्रण अधिकारी विद्या सावंत, महापालिकेचे सर्व उपायुक्त सहायक आयुक्त, सर्व विभागांचे पोलीस उपायुक्त, पोलीस सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम.एस.ई.डी.सी.एलचे अधिकारी, टोरंट पॉवरचे अधिकारी, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्याअनुषंगाने, मूर्तीकारांशी चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. तसेच मंडळांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंडप उभारणीसाठी ऑनलाईन परवानगी घेताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच गृहनिर्माण संस्थांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठीही ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली, याबाबत प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या.
ठाणे शहरासह मुंबईतील मुलुंड परिसरातील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन या घाटावर होत असल्याने तेथे क्रेनची सुविधा अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. मोठया उंचीचे गणपती विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी विचारात घेवून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल असेही महापौरांनी नमूद केले. गणेशोत्सवापूर्वी सर्व विसर्जन घाटांची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्या वतीने आगामी गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. यामध्ये विसर्जन व्यवस्था, वाहतूक नियोजन, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि प्रशासनाने आखून दिलेली नियमावली याची सविस्तर माहिती देण्यात आली.
ठाणे महापालिका हद्दीत एकूण 132 विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली असून 23 ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. सहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. तसेच मूर्तीकारांनी गणेशमूर्ती देताना पर्यावरणपूरक विसर्जन आणि शासनाच्या नियमांची माहिती नागरिकांना देण्यासाठी माहितीपत्रकही उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंडळांच्या समस्या ऐकून घेतल्या असून त्याबाबत प्रशासनासही निराकरण करण्याबाबत निर्देश दिले आहे. तसेच सर्व सार्वजनिक मंडळांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठकीच्या शेवटी केले.
आरास स्पर्धेत सहभागी व्हावे..
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे अर्ज माहिती व जनसंपर्क कार्यालय येथे उपलब्ध असून सर्व मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
महापौरांनी घेतली सहायक आयुक्तांची बैठक…
गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळाच्या बैठकीनंतर महापौरांनी सहायक आयुक्तांची तातडीची बैठक महापौर दालनात घेतली. या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी प्रभाग समितीतील ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे असतील ते दुरूस्त करुन घ्यावेत. तसेच मंडळांना आवश्यक परवानग्याही लवकरात लवकर देण्यात याव्यात. तसेच मंडळाकडून जे तक्रारींचे अर्ज प्राप्त होतील त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी तसेच विसर्जन घाटावर आवश्यक सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सहायक आयुक्तांना दिल्या.
