विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
ठाणे ३१: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून, अद्यापही ज्यांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) अथवा आवश्यक अर्ज भरून जमा केलेले नाहीत, त्यांनी कोणताही विलंब न करता ते आपल्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.ज्या नागरिकांना त्यांच्या बीएलओशी संपर्क साधणे शक्य होत नसेल किंवा काही कारणास्तव अर्ज बीएलओकडे जमा करता येत नसेल, अशा नागरिकांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अथवा ठाणे महानगरपालिका मुख्यालयात आपले अर्ज जमा करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रारुप मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक पात्र नागरिकाची माहिती योग्य प्रकारे नोंदविणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश असून, नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.17 ऑगस्ट 2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत किंवा आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी 8 ऑगस्ट 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर अर्ज अंतिम मुदतीपूर्वी जमा होऊ शकला नाही, तर संबंधित नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
त्यामुळे कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व नागरिकांनी त्वरित आपल्या बीएलओ, संबंधित प्रभाग समिती कार्यालय किंवा ठाणे महानगरपालिका मुख्यालयात अर्ज जमा करावेत, शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी voters.eci.gov.in किंवा ECINET App ला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी सोबतचा QR स्कॅन करावा.नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे!
