धोकादायक इमारतीचा ‘बी’ विंग कोसळला; भिवंडीत ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरू!
भिवंडी : भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या कोहीनूर इमारतीचा ‘बी’ विंग गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.कोहीनूर ही तळमजला अधिक चार मजली इमारत भिवंडी-निजामपूर महापालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. मात्र, इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच गुरुवारी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान ‘बी’ विंगचा काही भाग अचानक कोसळला.
या इमारतीत एकूण ४८ खोल्या असून प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या आहेत. रात्री सुमारे आठ ते नऊच्या दरम्यान इमारतीतून ‘कर…कर… कट…कट…’ असे आवाज येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी संभाव्य धोका ओळखत रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक कुटुंबे सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले. मात्र, काही रहिवासी आणि दुरुस्तीचे काम करणारे कामगार बाहेर पडत असतानाच इमारतीचा ‘बी’ विंग क्षणार्धात कोसळला.प्राथमिक माहितीनुसार, शामजी पाल (४६), संतोष पांडे उर्फ मुन्ना (४२) आणि मिराज शेख (३५) यांच्यासह काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. इतर अडकलेल्यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, एनडीआरएफचे पथक, श्वानपथक, भोईवाडा पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटविण्यासाठी यंत्रसामग्री, जेसीबी आणि दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत नागरिक वास्तव्यास कसे राहिले, तसेच दुरुस्तीचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण आणि जीवितहानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
