सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!
ठळक बातम्या ठाणे

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!

Aug 3, 2026

ठाणे ०३ : ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी सेवाभावी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे उत्साहात पार पडला. यावेळी जेष्ठ शल्य विशारद डॉक्टर श्रीपाद बोडस व डॉक्टर अंजली बोडस, ज्येष्ठ समाजसेवक अंजली व वसंत केळकर, जागतिक मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष किशोर नारायण पवार, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व करिअर मार्गदर्शक चंद्रशेखर शिंपी सर, उद्योजक संजय सागळे, उद्योजक योगेश कदम, उद्योजक स्वप्निल पायगुडे, सुजित बारस्कर सरचिटणीस मराठा समाज सुधागड आदींसह सुधागड तालुक्यातील अनेक मान्यवरांची आणि विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

संस्थेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून समाजसेवेचा वसा जपणारे डॉक्टर श्रीपाद बोडस यांना *सुधागड भूषण पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले. गेले अनेक वर्षे संस्थेत कार्यरत राहून विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमां मध्ये सहभागी होऊन संस्थेच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार सांभाळलेले ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण तेलंगे यांना यंदाचा “जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वसंत व अंजली केळकर दाम्पत्य, चंद्रशेखर शिंपी व प्राध्यापक भावेश दिघे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी सुधागड रहिवासी एमबीबीएस पदवी संपादन केलेली पाछापूर गावातील डॉक्टर साक्षी सचिन वारंगे व पिलोसरी गावातील तालुक्यातील पहिल्यांदाच एमपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेली सपना कांतीराम इंदुलकर तसेच वकिली, मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्रात पदवी परीक्षा संपादन केलेल्या आणि उज्वल यश मिळवलेल्या तरुणांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

डॉक्टर श्रीपाद बोडस हे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा या गावचे रहिवासी असून त्यांनी अमेरिकेतून वैद्यकीय उच्च पदवी संपादन करून गेली पन्नास वर्षे ते ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी वैद्यकीय सेवा देत आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी सुधागड तालुक्यात अनेक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून हजारो सुधागड वासियांना विनामूल्य औषधे व शस्त्रक्रियाही त्यांच्या रुग्णालयामार्फत केल्या आहेत. डॉक्टर बोडस यांनी सुधागड भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना सांगितले की, माझ्या वडिलांपासून मी गेले अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असताना माझ्या गावातील तालुक्यातील गरीब गरजू रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. सुधागड तालुका हा अत्यंत दुर्गम आणि आदिवासी बहुल विभाग असल्याने येथील गाव पाड्यांमध्ये एखादा रुग्ण आजारी झाल्यास त्याच्या पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी ती सेवा रोटरी क्लबच्या माध्यमातून सुधागड तालुक्याला मिळविण्याचा प्रयत्न आहे.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमांचा कौतुक करताना त्यांनी सांगितलं, गेल्या पन्नास वर्षात या संस्थेने जे कार्य केले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. अध्यक्ष ते पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यापर्यंत या संस्थेतील प्रत्येक व्यक्ती अगदी जीव लावून काम करताना आम्ही पाहत आहोत. त्यांच्या या उपक्रमात आमचाही सहभाग कायमच असेल. मला केव्हाही साथ द्या मी नेहमीच तुमच्या उपक्रमात सहभागी असेल. आज समोर बसलेले हे विद्यार्थी सुधागड तालुक्याचे भविष्य आहे हे खरे झेन जी आहेत. यांना घडवण्याचं आणि योग्य मार्गदर्शन करण्याचं काम सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ करीत आहे त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करायलाच हवं. हो यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली केळकर यांनी सुंदर कवितेतून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर चंद्रशेखर शिंपी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुधागड तालुक्यातील व ठाणे शहरातील महाराष्ट्र विद्यालयातील पितृछत्र हरपलेले विद्यार्थी यांना संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच पदवी परीक्षा, 10 वी १२ वी गुणवंत विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमात आर्थिक सहकार्य करणारे देणगीदार, हितचिंतक व सुधागड वासी यांचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी आभार व्यक्त केले. संस्थेच्या वतीने देणगीदारांचेही सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी संस्थेच्या सुवर्ण महोत्सव वाटचालीबाबत उपस्थित त्यांना माहिती दिली. गेल्या पन्नास वर्षात सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील 14 शाळा, गरीब गरजू विद्यार्थी, पितृछत्र हरपलेले विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था शैक्षणिक, क्रीडा व भौतिक सुविधा पुरवून मदत करीत आहे. टाटा कॅपिटल CSR माध्यमातून आतापर्यंत वरील कामासाठी खूप मदत सुधागडातील शाळांना केली आहे. ठाण्यामध्ये संस्थेचे भव्य सभागृह आकार घेत आहे. त्यासाठी सुधागड तालुका आणि ठाणे शहरातील देणगीदारांचा मदतीचा हात पुढे येत आहे.

हा मदतीचा ओघ असाच कायम राहावा आणि संस्थेची वास्तू लवकरात लवकर उभी राहावी यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते झटत आहेत. यापुढेही ठाणे शहर, सुधागड तालुका आणि शहराबाहेरील हितचिंतकांनी संस्थेच्या सभागृह निधीस असाच हातभार लावावा अशी विनंती करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत घेत असलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरचिटणीस राजू पातेरे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, उपाध्यक्ष वसंत लहाने, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, गणपत डीगे, प्रवीण तेलंगे, सुरेश शिंदे, चंद्रकांत बेलोसे, सरचिटणीस राजू पातेरे, शिक्षण समिती प्रमुख अनिल सागळे, खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, अंतर्गत हिशोब तपासणीस दत्ता सागळे, चिटणीस अविकांत साळुंके, उपशिक्षण समिती प्रमुख श्याम बागडे, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, उपक्रिडा समिती प्रमुख जय गणेश दळवी, उपसंस्कृतिक प्रमुख रघुनाथ इंदुलकर, संपर्कप्रमुख सुनील तिडके, आरोग्य समिती प्रमुख राजेश बामणे, प्रसिद्धी प्रमुख अजय जाधव, सहाय्यक सदस्य भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, गजानन जंगम, मोहन भोईर, दत्ता दळवी, बबन चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी वैशाली खेरटकर, प्रमिला लहाने, सुलोचना जाधव, शर्मिला काळभोर, शुभांगी शिंदे, माधुरी भोईर, दर्शना जाधव, कविता तेलंगे आणि सुधागड तालुक्यातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *