मेट्रो-६चे ८८ टक्के काम पूर्ण; कांजुरमार्ग कारशेडचा तिढा कायम, प्रकल्पाला विलंबाची शक्यता!
ताज्या बातम्या वाहतूक

मेट्रो-६चे ८८ टक्के काम पूर्ण; कांजुरमार्ग कारशेडचा तिढा कायम, प्रकल्पाला विलंबाची शक्यता!

Aug 2, 2026

Mumbai : मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – विक्रोळी मेट्रो-६ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडसाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.कांजुरमार्ग येथील सुमारे १५ हेक्टर जमीन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी एप्रिल २०२३ मध्ये एमएमआरडीएकडे हस्तांतरित केली होती. मात्र, या निर्णयाला केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन विभागाने न्यायालयात आव्हान दिले.

त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनीवर ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. संबंधित याचिका मागे घेतली असली, तरी जमिनीच्या वापरबदलाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.मेट्रोच्या गाड्या उभ्या करणे, त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि नियमित तपासणी करण्यासाठी कारशेड अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे कांजुरमार्ग कारशेडचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने मेट्रो-६च्या अंतिम चाचण्या आणि नियमित संचालनाच्या तयारीवर परिणाम झाला आहे.

याच कारणामुळे प्रकल्पाच्या वेळापत्रकातही विलंब झाला असून आता २०२७ मध्ये मेट्रो-६ सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.दरम्यान, कारशेडचा प्रश्न निकाली लागेपर्यंत प्रकल्प रखडू नये म्हणून एमएमआरडीएने पर्यायी योजना तयार केली आहे. पुणे मेट्रोच्या धर्तीवर कांजुरमार्ग येथे व्हायाडक्टवरच स्टॅब्लिंग लाइन, कोच वॉशिंग प्लांट, इन्स्पेक्शन पिट आणि वर्कशॉप उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कारशेडसाठीची जमीन मिळण्यास उशीर झाला तरी मेट्रो-६चे संचालन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *