Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!
भिवंडी ०३ : ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली आहे. राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय महिलेचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मृत महिलेचे नाव सुनिता अक्षयलाल पाल (वय ४६) असे असून त्या ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी होत्या. रविवारी त्या पती अक्षयलाल पाल यांच्यासोबत ॲक्टिवा दुचाकीवरून भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी जात होत्या.
दरम्यान, राहणाळ गावाजवळील काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली.या अपघातात अक्षयलाल पाल हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर सुनिता पाल या रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अक्षयलाल पाल जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ठाणे-भिवंडी मार्गासह भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.या दुर्घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे!
