Ganpati festival : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची मोठी तयारी ;कोकणवासीयांसाठी जादा गाड्या अन् विशेष सवलती!
मुंबई ०८: गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग लक्षात घेता एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या परिसरासह आसपासच्या भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी सुलभ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत.यंदा १४ सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून त्याआधी आणि त्यानंतर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
हीच गर्दी विचारात घेऊन ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत एसटीच्या अतिरिक्त बसेस धावणार आहेत. एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वाहतूक आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने त्यांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी व्हावा या उद्देशाने हे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांना तिकिटासाठी बसस्थानकावर रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपद्वारे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय, १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी ‘गट आरक्षण’सुविधा देखील सुरू केली जात आहे. या आरक्षणात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना नियमानुसार भाड्यात सवलत लागू राहील. मुंबई, ठाणे व पालघरमधील प्रमुख स्थानकांवरून या बसेस सुटतील आणि प्रवाशांची संख्या वाढल्यास त्यानुसार अतिरिक्त फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल!
