Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद!
मुंबई: १३ शिवसेना पक्षातील फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अतिशय अभ्यासपूर्ण युक्तिवाद मांडला. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष आणि अंतर्गत निवडणुकांबाबत नेमकी काय परिस्थिती होती, याची सविस्तर माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. या वेळी त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत, आयोगाने चुकीचे निर्णय घेतले आणि सोईनुसार अर्थ लावून निकाल दिला असा गंभीर दावा केला.
सिब्बल यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेतेपदाच्या निवडीवर आणि मुख्यमंत्रीपदावरही प्रश्न उपस्थित केले. पक्षातील फुटीची कोणतीही पूर्वकल्पना नसताना आणि कोणत्याही संघटनेची शहानिशा न करता केवळ आमदारांच्या संख्याबळावर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, जे बेकायदेशीर होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
या जोरदार युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी आपापसात चर्चा करत, कठीण परिस्थितीतही सर्व निर्णय घटनात्मक मार्गानेच घेतले जावेत आणि या प्रकरणातील जमिनीवरील सत्यता काय आहे हे तपासणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सिब्बल यांनी मांडलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि दाखल्यांनंतर आता सर्वोच्च न्यायालय यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
