Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!

Aug 31, 2026

ठाणे जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये ५ जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे ठाणे आणि भिवंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळील रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटावर घडली. रविवारी दुपारी मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात राहणारे आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे खाडीत पोहण्यासाठी उतरले होते. दुपारी सुमारे ३:०८ वाजता हे तिघे बुडाल्याची बातमी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर ४:२० च्या सुमारास तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.दुसरी घटना भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे तानसा नदीच्या पात्रात घडली.

विरार येथील रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे कुटुंबासह वज्रेश्वरीजवळील गरम पाण्याच्या कुंडात आघोळीसाठी आले होते. कुंडात अंघोळ केल्यानंतर कुटुंबीय नदीकाठावर गेले असता, अरुण चौहान (१३) आणि आयुष चौहान (१०) हे दोन सख्खे भाऊ नदीत आघोळीसाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले बुडू लागली. त्यावेळी आई खाऊ आणायला गेली होती आणि वडील रिक्षा साफ करत असल्याने मुलांकडे कोणाचे लक्ष गेले नाही.काही वेळाने मुले दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबाने आरडाओरड केली. त्यानंतर स्थानिक तरुणांनी तासाभराच्या शोधानंतर दोन्ही भावांना नदीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गणेशपुरी पोलिस अधिक तपास करत आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *