Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!
डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा फडकवून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे.
रॅलीची वेळ आणि मार्ग
शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता या उपक्रमाची सुरुवात होईल. प्रत्यक्ष रॅलीला सकाळी ७:३० वाजता डोंबिवली पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारडा सर्कल) येथील कॅप्टन विनयकुमार सचन स्मारक परिसरातून सुरुवात होईल. ही भव्य रॅली लोकमान्य टिळक पुतळ्याच्या दिशेने पुढे जाऊन चार रस्ता आणि नेरुरकर पथ मार्गे दत्त नगर चौकाकडे मार्गस्थ होईल. या रॅलीची शानदार सांगता दत्त नगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ होईल. याच ठिकाणी १५० फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले जाणार आहे.
१५ हजार विद्यार्थी आणि २५ हजार नागरिकांचा सहभाग
या ऐतिहासिक सोहळ्यात डोंबिवली आणि परिसरातील ५० ते ५५ शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय, साहित्यिक, सामाजिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक, स्काउट-गाइड, एनसीसी (NCC) व एनएसएस (NSS) चे कॅडेट्स, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींची विशेष उपस्थिती असेल.या फेरीत शहरातील २५ हजार नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे आमदार, नगरसेवक व पदाधिकारी खांद्याला खांदा लावून चालणार आहेत.सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीचा महाउत्सवरॅलीच्या संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर गीते वाजवली जाणार असून विविध ठिकाणी देशभक्तीपर नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल. समाजात एकता आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा हा महाउत्सव डोंबिवलीच्या सामाजिक एकतेचे प्रतीक ठरेल!
