Shahapur: दुर्गम भागातील विदारक वास्तव…रस्ता नसल्याने डोलीतून नेताना सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!
कसारा ०३ : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याअभावी आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय जगन्नाथ दापट याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावात राहणारा जगन्नाथ चौथी इयत्तेत शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी तो घरात झोपलेला असताना त्याला सर्पदंश झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावातील तरुणांची मदत घेत मुलाला उपचारासाठी नेण्याची तयारी केली.मात्र गावाला जोडणारा रस्ता नसल्याने तरुणांनी जगन्नाथला डोलीत बसवून दऱ्या-खोऱ्यांतून आणि पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटेने तब्बल पाच किलोमीटर पायी प्रवास करत दहिगाव गाठले.
तेथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने त्याला खर्डी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जगन्नाथची प्राणज्योत मालवली.या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त करत तातडीने रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे!
