Thane: गतिशील ठाण्याला शिंदेंच्या वेगाची साथ; ठाणे मॅरेथॉनमध्ये सर्वांना टाकले मागे…30 हजारांहून अधिक धावपटूंचा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग; ठाण्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावे यासाठी प्रयत्न!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: गतिशील ठाण्याला शिंदेंच्या वेगाची साथ; ठाणे मॅरेथॉनमध्ये सर्वांना टाकले मागे…30 हजारांहून अधिक धावपटूंचा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग; ठाण्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावे यासाठी प्रयत्न!

Aug 30, 2026

‘ठाणे: ता, 30 :विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जाणाऱ्या ठाण्याच्या ‘गतिशील’ प्रवासाला रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धावण्याचीही साथ मिळाली. 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्वतः सहभागी होत एकनाथ शिंदे यांनी धावपटूंमध्ये उत्साह निर्माण केला आणि धावताना त्यांनी सर्वांना मागे टाकले. त्यामुळे यंदाची मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा न राहता ‘गतिशील ठाण्या’च्या विकासाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी ठरली.ठाणे महापालिकेच्यावतीने आयोजित या मॅरेथॉनला रविवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवत देशभरातून आलेल्या धावपटूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी ते स्वतः मॅरेथॉनमध्ये धावले.

यावेळी महायुतीतील आमदार, नगरसेवक तसेच ठाण्यातील कलाकारांनीही त्यांच्यासोबत धाव घेतली.राजकारणात गतिमान निर्णय आणि आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिंदे यांचा हा वेग ठाण्याच्या रस्त्यावरही पाहायला मिळाला. शिंदे यांच्या सहभागामुळे उपस्थित नागरिक आणि धावपटूंमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला.यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 30 हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, खेळाडू, कलाकार आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत धावपटूंना प्रोत्साहन दिले.ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला 32 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. स्वर्गीय खासदार सतीश प्रधान यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या स्पर्धेने ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीत वेगळे स्थान निर्माण केले आहे.

‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ ही यंदाची संकल्पना असून, ठाण्याच्या विकासाच्या वेगाचे प्रतिबिंब त्यातून उमटते.यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे बदलत असून शहरामध्ये विकासाची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसोबतच विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.ठाणे महापालिकेने अनेक खेळाडू घडवले असून, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल शिंदे यांनी महापौर, आयुक्त आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “खेळामध्ये राजकारण आणू नये; खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे,” असा संदेशही त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून देशातील युवक व खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संधी मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली असून, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, विरोधी पक्षनेते अश्रफ शानु पठाण, नगरसेवक राजेश मोरे, संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता जाधव भोसले, मीनल संख्ये, नारायण पवार, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुधीर कोकाटे, मुकेश मोकाशी आणि सर्व लोकप्रतिनिधी, खेळाडू, अभिनेता मंगेश देसाई आणि टिव्ही मालिकेतील अनेक अभिनेते – अभिनेत्री आणि ठाणेकर स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *