Thane: ठाणे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा: बारवी धरण १००% भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
ठाणे

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा: बारवी धरण १००% भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Aug 11, 2026

ठाणे १० : ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरजवळील बारवी धरण पूर्ण १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आज पहाटे ४ वाजता धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून सध्या त्यांतून सुमारे २५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.गेल्या काही दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाला आहे. आतापर्यंत या भागात तब्बल २००२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण झाला.बारवी धरण हे ठाणे जिल्ह्याची पाण्याची गरज भागवणारा मुख्य स्रोत आहे.

या धरणामधून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर या शहरांसह परिसरातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो. धरण पूर्ण भरल्यामुळे या सर्व भागांतील नागरिकांची आणि उद्योगांची येत्या वर्षातील पाणीटंचाईची चिंता आता दूर झाली आहे.दरम्यान, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *