Thane: ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; उंच थरांसोबत वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे चित्र!
ठाणे : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले. विविध मंडळांकडून भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांची बक्षिसे, गोविंदा पथकांचा जल्लोष, नऊ थरांचे मानवी मनोरे आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मात्र, या जल्लोषाला काही ठिकाणी नियमभंग आणि वाहतूक कोंडीचे गालबोटही लागले.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा तब्बल २५४ सार्वजनिक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील अनेक गोविंदा पथके ठाण्यात दाखल झाली होती.
सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर गोविंदा पथकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.दहीहंडी फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे रचण्याची चुरस यंदाही पाहायला मिळाली. ठाणे आणि मुंबईतील अनेक पथकांनी नऊ थरांचे मनोरे रचत आपले कौशल्य दाखवले. काही ठिकाणी दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसह सलामी देणाऱ्या गोविंदांनाही रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली होती.दरम्यान, सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्याचा सामना गोविंदांना करावा लागला. मात्र, दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आणि गोविंदा पथकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला.
१४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाचा प्रश्नदहीहंडी उत्सवात सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना असतानाही काही ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. मानवी मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर सहभागी होणाऱ्या गोविंदाचे वय किमान १४ वर्षे असणे आवश्यक असतानाही काही ठिकाणी त्यापेक्षा कमी वयाची मुले मानवी मनोऱ्यात सहभागी झाल्याचे निदर्शनास आले.सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या नियमाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले. त्याचवेळी अनेक मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा आवाज मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचेही पाहायला मिळाले.
उत्सवाचा परिणाम वाहतुकीवरशहरातील विविध भागांत रस्त्यांवर दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. टेंभीनाका, रहेजा, घोडबंदर, कासारवडवली, पोखरण आणि कॅसल मिल नाका यांसह काही महत्त्वाच्या भागांतील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.मार्गबदलामुळे पर्यायी रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यातच गोविंदा पथकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण झाला.सेलिब्रिटींचीही उपस्थितीठाण्यातील विविध दहीहंडी उत्सवांना चित्रपटसृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अभिनेता गोविंदा, संजय दत्त, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि मानसी कुलकर्णी आदी सेलिब्रिटी उत्सवात सहभागी झाले.क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी गोविंदांशी मराठीत संवाद साधत ‘प्रो गोविंदा’ हा देशी खेळ असून त्याला भविष्यात ऑलिम्पिकपर्यंत नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अभिनेता सुनील शेट्टी यांनीही रिक्षा-टॅक्सीचालक तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मराठी भाषा शिकविण्याच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.एकूणच, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असला तरी उंच थरांचा थरार, सुरक्षेचे नियम आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समतोल साधण्याचे आव्हान यंदाच्या उत्सवातून पुन्हा एकदा समोर आले!
