Thane: डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडविले संगम डोंगरे यांचे उपोषण… डोंगरे यांची प्रकृती खालावली; मागण्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) चे नगरसेवक सभागृहात आवाज उठवणार!
ठाणे

Thane: डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडविले संगम डोंगरे यांचे उपोषण… डोंगरे यांची प्रकृती खालावली; मागण्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) चे नगरसेवक सभागृहात आवाज उठवणार!

Aug 8, 2026

ठाणे ०८: गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालवल्याने डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडविले. त्यांच्या मागणीसाठी ठामपाच्या सभागृहात आवाज उठविण्यात येईल, असे यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

गडकरी रंगायतन येथे असलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भूखंड ठामपास हस्तांतरीत करण्यात आला आहे. या ठिकाणी पार्किंग प्लाझा बांधण्यात येण्यात येत आहे. पार्किंगसह या ठिकाणी मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि कम्युनिटी हाॅल उभारावा, या मागणीसाठी संगम डोंगरे हे उपोषणाला बसले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषाताई भगत यांनी डोंगरे यांची भेट घेतली.

त्यावेळी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण प्रचंड खालावले असल्याचे तपासणीस आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांचे वैद्यकीय अहवाल तपासल्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी संगम डोंगरे यांना उपोषण मागे घेण्यास सुचविले. “आपल्या मागण्या रास्त आहेत. त्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सभागृहात आवाज उठवतील. पण, प्रकृती सांभाळली तरच लढा देता येईल”, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी डोंगरे यांना सांगितले. त्यानंतर संगम डोंगरे यांनी आपले उपोषण मागे घेतले. उपोषण मागे घेतल्यानंतर डोंगरे यांना तत्काळ सिव्हिल रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *