Thane: अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाच्या उपचारांचा खर्च परिवहनमंत्री उचलणार !
ठाणे: दहीहंडीच्या थरावरून कोसळल्याने गंभीर दुखापत झाल्यानंतर १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईरच्या मदतीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. नागेशच्या आईने आर्थिक मदतीऐवजी उपचारांचा खर्च उचलण्याची मागणी सरकारकडे केली होती.वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांशी संवाद साधताना सरनाईक यांनी नागेशच्या मदतीची घोषणा केली. नागेशच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.नागेशला नियमित औषधोपचार आणि फिजिओथेरपीची आवश्यकता असते.
प्रकृतीनुसार दर दोन महिन्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे उपचारांचा खर्च कुटुंबासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरले आहे. सुरुवातीच्या काळात मित्र आणि परिचितांनी आर्थिक मदत केली. मात्र, कालांतराने ही मदत कमी होत गेली. सध्या काही मोजके मित्र त्याच्या औषधोपचारासाठी मदत करीत आहेत. उपचारांचा वाढता खर्च पेलणे कठीण झाल्यानंतर नागेशच्या आईने सरकारकडे मदतीची मागणी केली.नागेशच्या कुटुंबाची परिस्थिती आणि त्याच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांची गरज लक्षात घेऊन सरनाईक यांनी ही जबाबदारी स्वीकारली. केवळ आर्थिक मदत न करता नागेशच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे!
