Thane: ठाणे-नवी मुंबई ट्रान्सहार्बर रेल्वेचा वक्तशीरपणा कोलमडला; उशिरा धावणाऱ्या गाड्या आणि फलाटांवरील राडारोड्यामुळे प्रवासी हैराण!
ठाणे २५ : ठाणे आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गिका एकेकाळी आपल्या शिस्तबद्ध आणि वक्तशीर सेवेसाठी ओळखली जात होती. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाच्या तुलनेत या मार्गावरील गाड्या वेळेत धावत असल्याने प्रवाशांचा या सेवेवर मोठा विश्वास होता. ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, वाशी आणि बेलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर कारखाने, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार झाला आहे. हा संपूर्ण परिसर जोडण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्गिका विकसित करण्यात आली आणि पुढे ठाणे ते वाशी, नेरूळ व पनवेलदरम्यान रेल्वेसेवा सुरू झाली.
या रेल्वेसेवेमुळे ठाणे, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कसारा या भागातील हजारो नोकरदारांना नवी मुंबईत जाणे सोयीचे झाले आहे. तसेच नवी मुंबईत अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांचीही या मार्गावर मोठी ये-जा असते. सुनियोजित शहर आणि रोजगाराच्या संधींमुळे अनेकांनी नवी मुंबईत घरे खरेदी केली असून, दररोजच्या प्रवासासाठी ट्रान्सहार्बर ही जीवन वाहिनी ठरली आहे. सध्या या मार्गावरून दररोज २५० हून अधिक रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या होतात.मात्र, मागील काही महिन्यांपासून या मार्गावरील गाड्या नियमितपणे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत असून सेवेचा वक्तशीरपणा पूर्णपणे कोलमडला आहे.
गाड्यांच्या या अनियमित वेळापत्रकामुळे नोकरदारांना कार्यालयात आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांना आता नेहमीपेक्षा लवकर घराबाहेर पडावे लागत असून, त्यांच्या संपूर्ण दैनंदिन वेळापत्रकावरच याचा विपरित परिणाम झाला आहे.या विलंबाशिवाय स्थानकातील अवस्था आणि गैरव्यवस्थापनामुळे प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ९ आणि १० वरून ट्रान्सहार्बरची वाशी, पनवेल आणि नेरूळच्या दिशेने वाहतूक होते. परंतु या फलाटांवर ठीकठिकाणी बांधकामाचे साहित्य, लोखंडी सांगाडे आणि राडारोडा टाकण्यात आला आहे. यामुळे फलाटावर प्रवाशांना साधे उभे राहण्यासाठीही जागा उरत नाही.
त्यातच ऐनवेळी रेल्वेगाडीचा फलाट बदलला जातो आणि त्याची वेळेत घोषणा देखील केली जात नाही. फलाट बदलल्याची माहिती न मिळाल्याने शेवटच्या क्षणी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी पळापळ आणि धावपळ होते.या संपूर्ण परिस्थितीवर स्पष्टीकरण देताना मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले की, ट्रान्सहार्बर मार्गावर नियमित गाड्या उशिरा नसतात; तसेच स्थानकावरील घोषणेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत!
