Thane: ठाण्यात २ वर्षांच्या बालकाला दिला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस; प्रकृती बिघडल्याने पालकांची FDA व पोलिसांत तक्रार!
ठाणे २०: ठाण्यातील ढोकाळी परिसरात एका दोन वर्षांच्या बालकाला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचे वडील सिद्धांत बोचरे हे आपल्या दोन वर्षांच्या बालकाला घेऊन ढोकाळी येथील रवींद्र पान शॉपमध्ये गेले होते. मुलाला ज्यूस प्यायचा असल्याने त्यांनी तेथून ट्रॉपिकाना ज्यूस खरेदी केला. ज्यूस प्यायला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच मुलाने तो पिणे बंद केले. ज्यूसची चव विचित्र आणि खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर सिद्धांत यांनी स्वतः तो चाखून पाहिला, तेव्हा त्यांनाही चव अत्यंत खराब असल्याचे जाणवले.त्यानंतर त्यांनी ज्यूसच्या पॅकवरील मुदत संपण्याची तारीख तपासली असता, त्याची एक्सपायरी डेट १६ एप्रिल २०२६ असल्याचे निदर्शनास आले.
ज्यूस मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर सिद्धांत बोचरे यांनी दुकानाच्या संचालकाकडे याबद्दल विचारणा केली; मात्र सुरुवातीला त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.या प्रकारानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याचा दावा पालकांनी केला असून त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलावर औषधोपचार सुरू करून त्याला अँटीबायोटिक औषध दिले आहे. तसेच, मुलाला उलट्या किंवा जुलाब सुरू झाल्यास प्रकृती लक्षात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.सिद्धांत बोचरे यांनी त्यांचे मित्र विकास धनावडे यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) जाऊन तसेच त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे. यासोबतच संबंधित पोलीस ठाण्यातही या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.
मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि पेये विक्रीसाठी ठेवल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अजित मैत्रि यांनी सांगितले की, तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यांच्यासमोरच संबंधित फूड सेफ्टी ऑफिसरला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नियमानुसार रवींद्र पान शॉप या दुकानावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले!
