Thane dahihandi festival : ठाण्यात दहिहंडीचा उत्साह: कोट्यवधींच्या बक्षिसांची लुटालूट अन् गोविंदा पथकांची गर्दी!
गोपाळकाला अवघ्या एका दिवसावर आला असताना दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या वर्षी ठाण्यातील दहीहंडी उत्सवासाठी कोट्यवधी रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. थरारक मानवी मनोरे, सिनेकलाकारांची उपस्थिती आणि गोविंदांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे यंदाचे वातावरण अधिकच रंगतदार होणार आहे.मुंबईसह कोकणातील पनवेल, पेण, अलिबाग, महाड आणि थेट रत्नागिरीतील नामांकित गोविंदा पथके ठाण्यातील दहीहंड्या फोडण्यासाठी आणि आपले कौशल्य दाखवण्यासाठी शहरात दाखल होत आहेत.
गोविंदांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे ठाण्यात प्रचंड गर्दी होणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांवर मोठे बदल करण्यात आले आहेत.पूर्वी केवळ ठराविक राजकीय पक्ष आणि संस्थांपुरता मर्यादित असलेला हा उत्सव आता शहरात चांगलाच विस्तारला आहे. यंदा राजकीय पक्ष, विविध संघटनांसह अंतर्गत रस्ते, चौक आणि मोठ्या गृहसंकुलांमध्येही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत या वर्षी दहीहंडी आयोजनात काहीशी घट झाल्यामुळे बहुतांश गोविंदा पथकांनी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे.ठाण्यातील प्रमुख आयोजनांमध्ये टेंभी नाक्यावरील शिवसेना (आनंद दिघे यांनी सुरू केलेली) दहीहंडी, जांभळी नाक्यावर राजन विचारे यांची महादहीहंडी, नौपाड्यात मनसे नेते अविनाश जाधव यांची दहीहंडी आणि रघुनाथ नगरमध्ये आमदार रवींद्र फाटक यांची संकल्प प्रतिष्ठाणची दहीहंडी यांचा समावेश आहे.
तसेच वर्तकनगरात प्रताप सरनाईक व पूर्वेश सरनाईक (संस्कृती युवा प्रतिष्ठाण), डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ आमदार शिवाजी पाटील (स्वामी प्रतिष्ठाण), कॅसल मिल येथे भाजप नगरसेवक कृष्णा पाटील (शारदा संकल्प प्रतिष्ठाण) आणि बाळकुम नाक्यावर साई जलाराम प्रतिष्ठाण व संजय भोईर यांच्या माध्यमातून दहीहंडी आयोजित केली आहे.याशिवाय रेमंड गृहसंकुल युवा स्टार प्रतिष्ठाण, रामचंद्र नगर श्री साई श्रद्धा सेवा समिती, कामगार नाका एकनाथ भोईर फाउंडेशन, इंदिरानगर दादुभाई शेख आणि टिकुजिनी वाडी चौक नवयुग मित्र मंडळ अशा अनेक ठिकाणी उत्सव साजरा होणार असून संपूर्ण ठाण्याला ‘गोविंदांचे गोकुळ’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे!
