Thane: ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन!

Sep 4, 2026

ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांसाठी अर्ज माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक गणेश मंडळांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण माहितीसह भरून १० सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून, संबंधित विभागाकडे सादर करावेत.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबत स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रकही प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छता पुरस्कार तसेच उत्कृष्ट मूर्तीकारासाठी स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. उत्कृष्ट मूर्तीकारासाठी प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

आरास निवडताना केवळ देखाव्याची कलात्मकता नव्हे, तर त्यामागील उद्देशाचाही विचार केला जाणार आहे. तसेच कोणत्याही धर्माविषयी असहिष्णु वृत्ती प्रकट करणाऱ्या देखाव्यांचा बक्षिसांसाठी विचार केला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. १० सप्टेंबरनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक गणेश मंडळांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *