Tukaram Mundhe: महाप्रसाद व भंडाऱ्यासाठी आता पूर्वपरवानगी बंधनकारक; एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय!
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सण-उत्सवांच्या काळात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा नवीन नियम आणि वार्षिक कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक अन्नछत्रासाठी किमान ७ दिवस आधी स्थानिक एफडीए अधिकाऱ्याला माहिती देणे आवश्यक असेल. याशिवाय, केटरर्स किंवा आयोजकांनी स्वयंपाकासाठी लागणारा माल आणि जिन्नस कुठून खरेदी केला, याची संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक राहील.
सणांच्या काळात मिठाई, खवा, ताक, पनीर, तूप, सुकामेवा आणि मटण-चिकनची मागणी लक्षणीयरीत्या वाढते, ज्यामुळे अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी एफडीएने ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ संकल्पनेअंतर्गत संपूर्ण वर्षातील सणांचे तीन स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ यांसारखे राज्यव्यापी उत्सव पहिल्या श्रेणीत; मकर संक्रांती, होळी, गुढीपाडवा, वारी, गोकुळाष्टमी यांसारखे सण दुसऱ्या श्रेणीत; तर स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरूस यांचा तिसऱ्या श्रेणीत समावेश आहे.
अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ही विशेष कारवाई एकूण चार टप्प्यांत राबवली जाणार आहे. ही प्रक्रिया कोणत्याही सणाच्या २१ दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर ३० दिवसांपर्यंत सुरू राहील. पहिल्या टप्प्यात धोकादायक अन्नाचे नकाशांकन करून प्रयोगशाळांना पूर्वसूचना दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात गिरण्या, घाऊक बाजार आणि वाहतुकीवर पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणी अचानक तपासणी होईल आणि चौथ्या टप्प्यात दोषी आढळणाऱ्यांवर थेट खटले दाखल करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल!
