कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!
ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अनेक लोकप्रिय मराठी कलाकारही दहीहंडी उत्सवाला भेट देणार आहेत.
गोविंदा पथकांच्या थरारक सलामी, उंचच उंच मानवी मनोरे आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषाने अष्टविनायक चौक परिसर दुमदुमणार आहे. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकाला रोख पारितोषिकासह आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय विविध थरांसाठीही आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.९ थरांसाठी ५५ हजार रुपये, आठव्या थरासाठी २१ हजार रुपये, सातव्या थरासाठी ११ हजार रुपये, सहाव्या थरासाठी ६ हजार रुपये आणि पाचव्या थरासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, मराठी चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या उपस्थितीमुळे उत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे. गोविंदा पथकांचा थरार, कलाकारांची उपस्थिती आणि हजारो ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कोपरीतील दहीहंडी उत्सव यंदा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
दहीहंडी उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून संघभावना, शिस्त, साहस, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. गोविंदा पथकांच्या कौशल्याला प्रोत्साहन देतानाच दहीहंडीची समृद्ध परंपरा आणि मराठी सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे शहरातील विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी यांनी केले आहे!
