लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र व सुशोभीकरणाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण!
ठाणे (०१) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत आज उत्साहात पार पडले.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या एका वाक्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेने त्यांना बहाल केलेली ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांच्या लोकमान्य नेतृत्वाची साक्ष असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या व तांत्रिक निकषांमुळे ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून लोकमान्य टिळकांचे भव्य भित्तिचित्र आणि सुशोभित परिसर विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगताना, याच ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी भाषणे केली होती, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि धर्मवीर आनंद दिघे यांचाही या परिसराशी असलेला भावनिक संबंध नरेश् म्हस्के यांनी सांगितला.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून त्यांनी दिलेल्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक पिढया येथे राहत असल्याचे स्थानिक रहिवाशी महेश जोशी यांनी सांगितले या प्रकल्पांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था असलेला छोटेखानी बैठक परिसरही तयार करण्यात आला आहे. या भित्तीचित्राशेजारी पुण्यातील केसरी वाडा परिसरात असलेली लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी लावण्यात आली आहे. तसेच येथे नागरिक दररोज एकत्र येऊन संवाद साधू शकतील. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात नव्या पिढीला स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास, त्यांचे कार्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. हे भित्तीचित्र तसेच या परिसर सुशोभित करणाऱ्या अभय पाटील यांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करताना खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे व स्थानिक नागरिक!
