Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!
ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार असलेल्या दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्रीचे तसेच चव्हाण यांच्या पत्नीचेही नाव वगळल्याचे आढळून आल्याचे विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ठाण्यातील एसआयआर मोहीमेचा काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी पर्दाफाश केला आहे. ही मोहिम पारदर्शकपणे न राबवता अनेक ठिकाणी बीएलओंनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या सर्वेक्षण केल्याचा दावा ॲड. चव्हाण यांनी केला.ओवळा-माजिवडा मतदारसंघात सुमारे साडेतीन लाख, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी एसआयआर मोहिम ८० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला; मात्र प्रत्यक्षात ही मोहीम ८० टक्के फ्लॉप ठरल्याचा घणाघात चव्हाण यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी, ठाण्याचे निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या ८० वर्षीय मातोश्री वत्सला बाबुलाल पैठणकर यांनी अर्ज भरूनही त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, चव्हाण यांच्या पत्नी अरुणा विक्रांत चव्हाण यांचेही अनेक दशकांपासून मतदार यादीत असलेले नाव एसआयआर प्रक्रियेनंतर वगळल्याचे त्यांनी उघड केले. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. वगळण्यात आलेली सर्व नावे तातडीने पूर्ववत करावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच एसआयआर मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणीही विक्रांत चव्हाण यांनी केली आहे!
