Dombivli : डोंबिवलीत रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांचे केळकर रोडवर ठिय्या आंदोलन!
वाहतूक

Dombivli : डोंबिवलीत रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांचे केळकर रोडवर ठिय्या आंदोलन!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७: संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली पूर्व भागातील केळकर-पाटकर रस्ता रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक मागील काही दिवसांपासून भाडे नाकारत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले.मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व केळकर रिक्षा स्टँडवर संध्याकाळी सात वाजल्यापासून एकही रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी आपली रिक्षा उभी करत नाही. मुसळधार पाऊस असला तरी रिक्षा चालक या रस्त्यावर फिरकत नाहीत.

दिवसभर या स्टँडवर प्रवासी वाहतूक केली जाते, मात्र संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना तत्पर सेवा देण्यास हे रिक्षा चालक टाळाटाळ करत आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.रिक्षा स्टँडवर रिक्षा उभी केली की प्रवाशांच्या मागणीप्रमाणे शेअर भाड्याने जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत स्टँडवर रिक्षा नसल्या की प्रवासी थेट रिक्षा करून एकरकमी भाडे देण्यास तयार होतात. एका फेरीत मोठे भाडे मिळत असल्याने संध्याकाळच्या वेळेत पूर्व भागातील रिक्षा चालक नियमितच्या प्रवाशांना सोडण्याऐवजी थेट भाड्याकडे अधिक लक्ष देतात. ते रिक्षा स्टँड सोडून बाजूचे चौक आणि रस्त्यांवर रिक्षा उभ्या करून थेट भाड्याची वाट पाहतात, असे प्रवाशांनी सांगितले.

या समस्येवर तोडगा म्हणून केळकर स्टँडवर रिक्षा उपलब्ध होत नसतील तर केडीएमटीने या भागात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच या स्टँडवर सकाळपासून ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक विभागाचे पोलीस तैनात ठेवावेत, अशा मागण्या प्रवाशांनी केल्या आहेत. रिक्षा चालकांनी स्टँडवर उभे राहून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणाप्रमाणे सोडण्याची हमी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले की, मोठे भाडे मिळवण्यासाठी रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारून प्रवाशांना त्रास देत आहेत.

रिक्षा चालकांनी प्रवासी नाकारले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक विभागाला आहे, परंतु डोंबिवली वाहतूक विभागाचे हवालदार या रिक्षा चालकांची पाठराखण करत आहेत. यासंदर्भात पोलीस उपाध्यक्षांकडे तक्रार केली असून अशा रिक्षा चालकांवर आरटीओ आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई केली पाहिजे.दुसऱ्या बाजूला, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे यांनी आश्वासन दिले आहे की, केळकर रस्ता रिक्षा स्टँडवर नियमित वाहतूक पोलीस तैनात केला जाईल आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर योग्य ती कारवाई केली जाईल!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *