Thane: ठाण्यातील उपवन औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग!
ठाणे ताज्या बातम्या

Thane: ठाण्यातील उपवन औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग!

Aug 16, 2026

ठाणे १६ :ठाण्यातील उपवन परिसरात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२०० चौरस फुटांच्या जागेत प्लास्टिक शीटचे उत्पादन करणाऱ्या ‘एसआरके ट्रेडर्स’ या कंपनीला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. कंपनीच्या आवारातून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे दिसताच स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला याची माहिती दिली. आगीचे गांभीर्य ओळखून वर्तकनगर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने मोठ्या यंत्रसामग्रीसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कंपनीच्या आतील भागात आग वेगाने पसरल्यामुळे प्लास्टिक शीट तयार करण्यासाठी लागणारी यंत्रे आणि कच्च्या साहित्याने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत सकाळी ७ वाजताच्या सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, ज्यामुळे ही आग आजूबाजूच्या इतर औद्योगिक आस्थापनांमध्ये पसरण्याचा मोठा धोका टळला. या दुर्घटनेत कंपनीतील सर्व यंत्रसामग्री व साहित्य जळून खाक झाले असून, आगीच्या तीव्र उष्णतेमुळे कंपनीच्या छतावरील सिमेंटचे पत्रेही फुटले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *